या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबाबत आता आपण विचार करू. परीक्षा २०० गुणांची असून, त्यासाठी १२० मिनिटांचा कालावधी देण्यात येतो. प्रत्येक प्रश्नास एक गुण याप्रमाणे २०० गुणांची परीक्षा असून, हा अभ्यासक्रम सहा घटकांत विभागलेला आहे. यापैकी पाच घटक हे २२ उपविभागांत विभागले असून, या पाच घटकांना प्रत्येकी ३० गुण आहेत तर सहाव्या घटकाला ५० गुण ठेवण्यात आले आहेत. परीक्षा मे महिन्यात होणार असल्याने परीक्षेची चांगली तयारी करण्यास उमेदवारांना भरपूर वाव आहे. परीक्षेपूर्वी सर्व घटकांची व्यवस्थित तयारी करून नियोजित वेळेत जास्तीत जास्त अचूक उत्तरे निवडणाऱ्या उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड होते. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंग पद्धत असल्याने उत्तरे निवडताना काळजीपूर्वक विचार करा. या पद्धतीमुळे योग्य अभ्यास करणारेच योग्य उत्तरे निवडू शकतात.या परीक्षेसाठी १) कला शाखा घटक (३० गुण) (प्रत्येक उपघटकावर सहा गुण) २) विज्ञान व अभियांत्रिकी शाखा (३० गुण) (प्रत्येक घटकावर सहा गुण) ३) वाणिज्य व अर्थव्यवस्था (३० गुण) (प्रत्येक उपघटकावर सहा गुण) ४) कृषी शाखा- (३० गुण) (प्रत्येक उपघटकावर सहा गुण) ५) चालू घडामोडी - ३० गुण ६) बुद्धिमापन चाचणी- ५० गुण.अशा प्रकारे प्रश्नांची व गुणांची विभागणी केलेली आहे. हा अभ्यासक्रम पाहता आपल्या निश्चित लक्षात येईल की, येथे सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना समान संधी आहे. जो योग्य पद्धतीने भरपूर अभ्यास करील तो मुख्य परीक्षेस पात्र होईल. त्यामुळे सर्व विषयांचे पायाभूत ज्ञान उमेदवारास आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराला सर्व क्षेत्राची माहिती करून घ्यावी लागते. तसेच एखाद्या क्षेत्रातील ज्ञानाचा वापर दुसऱ्या क्षेत्रात करायची कला त्यास अवगत असल्यास तो स्वत:ची तयारी इतरांपेक्षा अधिक तत्परतेने आणि कार्यक्षमतेने करू शकतो. म्हणजेच तुमचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक तसेच नावीन्यपूर्ण असला पाहिजे.योग्य अभ्यास व ध्येय गाठण्याची स्फूर्ती हेदेखील यश मिळविण्यासाठी आवश्यक आहे. रविवारी अथवा सुट्टीच्या दिवशी आपणास वेळ आहे म्हणून अभ्यास करू हा दृष्टिकोन बाळगून स्वत:च्या करिअरशी खेळू नका. अभ्यास करताना वेळेचे नियोजन करा. घटकानुसार प्रत्येक घटकाला किती वेळ द्यायचा याचे नियोजन करा. मागील काही वर्षांच्या प्रश्नपुस्तिका पाहून त्यानुसार अभ्यासाची दिशा ठरवा. या परीक्षेतून डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, व्हायचे ठरविले असले तरी इतर परीक्षा म्हणजेच बँक क्लर्क परीक्षा, प्रोबेशनरी ऑफिसर, स्टाफ सिलेक्शन कमिशनद्वारे होणाऱ्या परीक्षा द्याव्यात, जेणेकरून स्पर्धा परीक्षांची चांगल्यात चांगली तयारी होईल.या परीक्षांची तयारी करणारे नवीन विद्यार्थी पॅटर्न समजून घेण्यासाठी बराच वेळ घालवतात. त्यामुळे प्रत्यक्ष अभ्यासाला दिशा मिळण्यासाठी वेळ जातो. नेमका अभ्यास कसा करावा? कोणत्या विषयाला किती वेळ द्यावा? अभ्यासाची सुरुवात कोणत्या विषयापासून करायची? हेच त्यांना कळत नाही, याचे कारण म्हणजे महाविद्यालयीन स्तरावर असणारी परीक्षा व ही परीक्षा या दोन्ही भिन्न आहेत. आपल्या विद्याशाखेबरोबरच आपणास इतर विद्याशाखेचा अभ्यास करायचा असतो. त्यामुळेच एखाद्या विषयात पारंगत राहून चालत नाही, तसेच एखादा टॉपिक अथवा विषय आवडतो म्हणून त्याचे जास्त वाचन आणि क्लिक विषयाकडे दुर्लक्ष करू नये, तर संपूर्ण विषयांची तयारी करावी.सरकारी अधिकारी म्हणजे मानसन्मान, रुबाब, प्रतिष्ठा, पैसा, निवृत्तीनंतर पेन्शन, सुरक्षितता या सर्व बाबींचा फक्त विचार करून सरकारी अधिकारी बनवण्याची स्वप्ने पाहू नका. आपण समाजोपयोगी, विधायक तसेच महाराष्ट्र राज्याला देशातच नव्हे तर साऱ्या विश्वात आदर्श राज्य बनवायचे आहे असे समजून तसेच देशाच्या प्रगतीसाठी व लोकोन्नतीसाठी कार्य करायचे आहे हे उद्दिष्ट बाळगून परीक्षा पास होण्यासाठी अभ्यासाला लागा.पूर्वपरीक्षेनंतर पेपर कसा गेला याचा अंदाज लगेचच येतो. जर पेपर चांगला गेला असेल तर वेळ न दवडता मुख्य परीक्षेच्या तयारीला लागायचे.प्रयत्नांची बेरीज, चुकांची वजाबाकीसद्गुणांचा गुणाकार, दुर्गुणांचा भागाकार योग्य पद्धतीने केला तर जीवनातील गणितात यशाचे उत्तर हमखास मिळते. अभ्यासासाठी शुभेच्छा.
0 comments:
Post a Comment