Powered by Blogger.

Wednesday, 28 March 2012

गुगलचा शेरपा कवितर्क राम श्रीराम

कवितर्क राम श्रीराम हे गुगलच्या स्थापनेपासून ते आज मार्च 2012 पर्यंत सातत्याने गुगल कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली ह्या संगणक आणि इंटरनेटच्या इलाक्यात सर्वाधिक मान असणाऱ्या व्यक्तींपैकी श्रीराम हे एक आहेत. श्रीराम हे मध्यमवर्गीय घरात भारतात जन्माला आले आणि आज त्यांची व्यक्तिगत संपत्ती 7500 कोटी रूपये (1.5 बिलियन डॉलर्स) आहे. जगातील पहिल्या 700 सर्वाधिक श्रीमंतांमध्ये श्रीराम यांचा क्रमांक 655 वा आहे.
आज 54 वर्षांचे असलेले राम श्रीराम यांचा जन्म बंगलोरचा. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिल वारले. एकुलता एक मुलगा. आई तेव्हा 25 वर्षांची होती आणि कॉलेजमध्ये शिकत होती. त्यामुळे  छोट्या रामचं संगोपन आजी आजोबांनी मायेनं केलं. आजोबांचा एक छोटा व्यवसाय होता. इलेक्ट्रिक केबल्स व साधनांशी संबंधित त्यांचं काम असे. एक मध्यमवर्गीय कुटुंब असं एकूण वातावरण होतं. आई पुढे एम.ए. झाली आणि मद्रास विद्यापीठात इंग्रजीची प्राध्यापक म्हणून ती काम करू लागली. राम श्रीराम आपल्या आईने आपल्या आयुष्याला शिस्त लावली हे आवर्जुन सांगतात. वेळेवर शाळेत जाणं, शाळेला कधीही दांडी न मारणं, सर्व अभ्यास वेळेवर करणं, नीटनेटकं राहणं वगैरे आईची करडी शिस्त होती त्यामुळेच मी घडलो हे ते नम्रपणाने सांगतात.

राम श्रीराम यांचं शिक्षण मद्रास (आता चेन्नई) येथे झालं. मद्रास विद्यापीठातून 1977 साली त्यांनी सायन्समधील पदवी घेतली, आणि ते अमेरिकेत गेले. अमेरिकेत मिशिगनमध्ये रॉस स्कुल ऑफ बिझनेस मधून त्यांनी बिझनेस अडमिनिस्ट्रेशनमधील पदवी घेतली. साधारणतः सात ते आठ वर्षे त्यांनी नोर्टेल नेटवर्क्स कॉर्पोरेशन ह्या कंपनीत नोकरी केली, आणि 1983 च्या आसपास त्याच कंपनीचे डायरेक्टर, मार्केटींगह्या पदावर त्यांची सिलिकॉन व्हॅलीमध्ये बदली झाली. ह्या कामाच्या निमित्ताने श्रीराम यांनी जगभर प्रवास केला. जपान पासून ते युरोपिय देशांपर्यंत सर्वत्र मार्केटींगचं काम करताना त्यांना मोलाचा अनुभव मिळाला. 1983 चा सुमार हा पर्सनल काँप्युटरच्या उदयाचा काळ. एकीकडे मायक्रोसॉफ्टचा डॉस बाजारपेठेत आला होता, तर दुसरीकडे नेटवर्कींगचा बोलबाला जोरात सुरू झाला होता. अशा वातावरणात दहा वर्षे सिलिकॉन व्हॅलीत काढल्यावर 1994 मध्ये त्यांनी नेटस्केप कम्युनिकेशन्स ह्या कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट ह्या उच्च पदाची सुत्रे हाती घेतली. नेटस्केपचा ब्राऊझर त्यावेळी अतिशय लोकप्रिय होता. पुढे मायक्रोसॉफ्टचा इंटरनेट एक्स्प्लोअरर बाजारात आला आणि नेटस्केप विरूद्ध इंटरनेट एक्स्प्लोअरर हे टोकाचं युद्ध झालं. त्यात नेटस्केप जायबंदी झालं आणि राम श्रीराम तिथून बाहेर पडले. बाहेर पडल्यावर 1998 च्या सुमारास त्यांनी junglee.com ही आपली स्वतःची कंपनी सुरू केली. ही कंपनी ई कॉमर्सशी संबंधित होती. ज्या वस्तू ऑनलाईन उपलब्ध आहेत त्यांच्या भावांची व किंमतींची तुलना करून ग्राहकांना मार्गदर्शन करणारं एक सर्च इंजिन junglee.com चालवित असे. 1998 हे वर्ष ई कॉमर्सच्या क्षेत्रात amazon.com ह्या जेफ बेझोस यांच्या कंपनीचं होतं. अमेझॉन मोठ्या महत्त्वाकांक्षा घेऊन खूपच जोरात होती. त्या भरात श्रीराम यांची junglee.com ही कंपनी अमेझॉनने विकत घेतली. असं म्हणतात की सुमारे 100 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 500 कोटी रूपये) ची किंमत अमेझॉनने junglee.com साठी मोजली. श्रीराम यांची कंपनी त्यांच्यासकट घेतल्याने श्रीराम अमेझॉनचे व्हाईस प्रेसिडेंट, बिझनेस डेव्हलपमेंट ह्या पदावर रूजू झाले. अमेझॉनचे सर्वेसर्वा असणारे जेफ बेझॉस आणि राम श्रीराम त्यामुळे एकमेकांच्या अधिक जवळ आले. श्रीराम यांच्याच शब्दावरून जेफ बेझॉस यांनी 1998 च्या सुमारास गुगलमध्ये गुंतवणूक केली. जानेवारी 2000 मध्ये श्रीराम यांनी अमेझॉन सोडली आणि स्वतःची Sherpalo ही कंपनी सुरू केली. अल्पावधीतच नव्या स्टार्ट-अप कंपन्यांचे मार्गदर्शक म्हणून राम श्रीराम यांची ख्याती सर्वत्र पसरली. ते स्वतःही स्वतःचा उल्लेख Sherpa of start-ups असा करू लागले. नव्या कंपन्यांना भांडवल देणारी त्यांची Sherpalo ही कंपनी केवळ भांडवल देऊन थांबत नसे, तर आवश्यक ते मार्गदर्शनही करत असे.
Ram’s book of mistake असा एक वाकप्रचार सिलिकॉन व्हॅलीमध्ये सर्वत्र प्रसिद्ध आहे. प्रत्यक्षात श्रीराम यांनी अशा प्रकारचे कोणतेही पुस्तक लिहीलेले नाही. परंतु त्यांच्या अनुभवांचा आणि चुकांचा उल्लेख करीत नव्या कंपन्यांनी कोणत्या गोष्टी टाळाव्यात याचं मार्गदर्शन ते करीत असत. गुगललाही अशा प्रकारचे फार मोठे मार्गदर्शन राम श्रीराम यांनी दिले. याबद्दलचा एक किस्सा असा सांगतात की श्रीराम यांनी एकदा सर्जी ब्रिनला, गुगलला बिझनेस प्लानची गरज आहे असे सांगितले. त्यावर सर्जीने श्रीरामना विचारले की What is business plan? तर, एवढ्या बारीक सारीक स्तरावरून गुगलला श्रीराम यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. गुगलने उत्तम माणसंच नेमली पाहिजेत हा श्रीराम यांचा संचालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून सतत आग्रह असे. त्यांचं म्हणणं होतं की जर तुम्ही A Grade ची माणसं नेमलीत तर ती त्यांच्या हाताखाली B आणि C Grade ची माणसं घेतील. पण तुम्ही घेतानाच B किंवा C Grade घेतलेत तर ते हाताखाली D दर्जाची माणसे घेतील आणि मग सगळा गोंधळ होईल. त्यामुळे उत्तम माणसं घेण्यासाठी ती शोधायला हवीत आणि बाहेर जाऊन त्यांना गुगलमध्ये आणायला हवं हा श्रीराम यांचा सतत आग्रह असे. यासाठी ते नेटस्केप मध्ये असताना त्यांना जे जे उत्तम इंजिनीयर्स व मॅनेजर्स भेटले होते त्यांना त्यांना त्यांनी गुगलमध्ये येण्याची शिफारस केली. अगदी सुरूवातीच्या वर्षातच गुगलला जनसंपर्क अधिकाऱ्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं.
राम श्रीराम यांनी पुढेही गुगलमध्ये फार मोठी गुंतवणूक केली. एका अंदाजानुसार श्रीराम यांच्याकडे आज गुगलचे 900000 शेअर्स आहेत. गुगलच्या एका शेअरचा आजचा भाव 606.80 डॉलर्स आहे. त्या व्यतिरिक्त आपल्या देशातील naukri.com, cleartrip.com पासून ते अमेरिकेतील plaxo.com, stumbleupon.com, वगैरे अनेक कंपन्यांशी त्यांचा सल्लागार, संचालक किंवा गुंतवणूकदार म्हणून संबंध आलेला आहे. आजही गुगल कंपनीसाठी वाट दाखवणारा एक शेरपा ही त्यांची भूमिका सर्जी आणि लॅरी स्वीकारतात. श्रीमंती आणि कोटीच्या कोटी उड्डाणे करणाऱ्या ऱक्कमांचे आकडे बाजूला ठेवा, पण, एक श्रीराम नावाचा मूळ भारतीय माणूस इंटरनेटवरील गुगल कल्पवृक्षाखाली अधिकाऱ्याच्या खुर्चीत बसून मार्गदर्शनाची भूमिका बजावतो आहे ही गोष्टही तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान वाटण्यासारखी आहे यात शंका नाही. आणि, जाता जाता त्यापेक्षा आणखी एक महत्त्वाची गोष्ट ! एवढ्या साऱ्या कर्तृत्वानंतरही निगर्वी वृत्तीने पाय जमिनीवर ठेवून स्वतःला नम्रतेने फक्त शेरपाम्हणवण्यासाठी जी आत्मिक जिगर लागते ती ह्या मूळ भारतीय माणसाकडे आहे ही देखील एक फार मोठी गोष्ट आहे. कदाचित त्यामुळेच आज स्टॅनफोर्ड विद्यापीठाचा एक विश्वस्त (ट्रस्टी) ह्या मोठ्या पदावर श्रीराम यांची निवड झाली आहे.

0 comments:

Post a Comment